धाराशिव : नाम फाउंडेशन व नॅचरल शुगर यांच्या विद्यमाने नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रातील रांजणी येथे जलतारा या नावीन्यपूर्ण जलसंधारण उपक्रमाचा प्रारंभ कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यावर भर देण्यात येणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल १० हजार जलतारा प्रकल्प राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याच्या शेती विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत असून, कार्यक्षेत्रात किमान दहा हजार खड्डे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जलतारा प्रकल्पासाठी शासनाकडून निधी नसल्यामुळे नाम फाउंडेशन व नॅचरल उद्योग समूह यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जेसीबी मशीन नाम फाउंडेशनकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्या मशीनसाठी लागणारे डिझेल नॅचरल शुगरकडून देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत खोदण्यात येणाऱ्या प्रत्येक खड्यात सुमारे २ ते २.५ लाख लिटर पाणी मुरवले जाणार असल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यासही हातभार लागणार आहे. जल संधारणासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम विविध भागात राबवण्यात येत आहे.


















