धाराशीव : गोकुळ शुगरने गेल्या सात महिन्यांपासून ऊस बिले थकीत ठेवली आहेत. या पार्श्वभूमीवर १४ मे रोजी खुदावाडी येथील हनुमान मंदिरात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी कारखाना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची निर्णायक बैठक खुदावाडी येथे १७ मे रोजी आयोजित करण्यात आली. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती अरविंद घोडके यांनी दिली. तब्बल सात ते आठ महिन्यांपूर्वी कारखान्याला ऊस पुरवठा करूनही हक्काचे बिल खात्यावर जमा झाले नाही असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
ऊस बिले देण्याबाबत साखर कारखान्याकडून वारंवार तारखांवर तारखा देऊनही दिलेला शब्द पाळला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर २०२४-२५ हंगामातील ऊस बिले देखील अद्याप प्रलंबित असल्याने हा अन्याय अधिकच गंभीर बनल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गोकुळ शुगर फॅक्टरी प्रशासनाविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. एकीकडे शेतीचा वाढता खर्च, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न समारंभ, शेती मशागतीचा खर्च सांभाळताना शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी व हतबल झाला आहे याकडे शेतकऱ्यांनी बैठकीत लक्ष वेधले.


















