साखर उद्योगात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान मोलाचे, शेतकऱ्यांना दिले आर्थिक स्थैर्य

कोल्हापूर : राजकारण, समाजकारण, शिक्षण या क्षेत्रांसह साखर उद्योग क्षेत्रातही आपला ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे साखर, उद्योग क्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, शिक्षण, राजकारण, शेती अशा क्षेत्रात योगदान देणारी दिग्गज व्यक्ती हरवली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक ते तीन राज्यांचे राज्यपाल अशी झळाळती कारकिर्द असलेल्या डी. वाय. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर ते सहकाार आणि कृषी क्षेत्र आणि साखर क्षेत्रातही कार्यरत होते. ते गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते.

दिवंगत डी. वाय. पाटील यांचे मित्र, प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना पाटील यांच्या सहकार, शेती क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, डी. वाय. पाटील यांनी गगनबावड्यात त्यांनी २००३ मध्ये सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. ते त्यांचे मोठे धाडस होते. त्यांनी कारखाना उत्तमपणे चालवून दाखवला. आज त्यांचे चिरंजीव आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार वरून साडेसात हजार टन झाली आहे. डी. वाय. दादांच्या नावाने गगनबावडा येथेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ शुगर अँड अलाइड प्रॉडक्ट्‌स टेक्नॉलॉजी ही संस्था आहे. त्यांच्या जाण्यामुळे साखर उद्योग, समाजकारण, राजकारण, शिक्षण इ. क्षेत्रांमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. डी. वाय. पाटील यांनी कोल्हापूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. ते सलग दोनवेळा आमदार होते, प. बंगाल, त्रिपुरा, बिहार राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले. दादांचा आवाका प्रचंड होता. त्यांनी उभा केलेली शिक्षण संस्था हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे, असे डॉ. मुळीक यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here