‘डीएसटीए’चे ७१ वे वार्षिक दोन दिवसीय अधिवेशन उद्यापासून पुण्यात; देशभरातील साखर तज्ज्ञ, कारखानदार राहणार उपस्थित

पुणे : देशातील साखर उद्योग, इथेनॉल, जैवऊर्जा आणि अत्याधुनिक साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या घडामोडींना दिशा देणारे द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) – डीएसटीए यांचे ७१ वे वार्षिक अधिवेशन तसेच ‘शुगर एक्स्पो-२०२६’ चे आयोजन ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेल येथे करण्यात आले आहे.अधिवेशनाचे उद्घाटन ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी अर्थ व गृहमंत्री तथा आमदार जयंत पाटील असतील. विधान परिषदेचे सदस्य आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी तसेच द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आर. व्ही. कुंभार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

अधिवेशनात साखर उद्योगासमोरील सध्याची आव्हाने, उत्पादन खर्च, ऊर्जा कार्यक्षमता, इथेनॉल निर्मिती, जैवऊर्जा, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, आधुनिक यंत्रसामग्री आणि उद्योगातील नव्या तांत्रिक संधी या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.याचबरोबर ‘शुगर एक्स्पो-२०२६’ मध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उद्योगातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी खुले राहणार आहे.

अधिवेशनादरम्यान ‘डीएसटीए’चे २०२६ चे विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. साखर उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येईल. ‘डीएसटीए’चे अध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून, उपाध्यक्ष एस. डी. बोखारे (महाराष्ट्र), एम. के. पटेल (गुजरात) आणि सी. जी. माने (कर्नाटक) तसेच त्यांची टीम अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here