मुंबई : भारत स्वच्छ वाहतूक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत असताना, शुगर इथेनॉल बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स (SEIC) 2026 मध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी वाहतूक क्षेत्राचे डीकार्बोनायझेशन करण्यासाठी संतुलित आणि तंत्रज्ञान-तटस्थ (Technology Neutral) दृष्टिकोनाची आवश्यकता व्यक्त केली. त्यांच्या मते, इलेक्ट्रिक वाहने (EV), फ्लेक्स-फ्युएल वाहने (FFV) आणि इतर पर्यायी इंधन तंत्रज्ञानांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी परस्परपूरक भूमिका बजावली पाहिजे.
“EV विरुद्ध FFV : द मोजो फॅक्टर” या विषयावरील चर्चासत्रात स्वच्छ वाहतुकीच्या भविष्यासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. इलेक्ट्रिक वाहनेच स्वच्छ हवेचा संपूर्ण उपाय आहेत का, उत्सर्जन केवळ मूल्यसाखळीतील इतर टप्प्यांवर स्थानांतरित होत आहे का आणि विविध तंत्रज्ञानांना समान संधी मिळण्यासाठी धोरणकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यावी, यावर विचारमंथन करण्यात आले.या सत्राचे सूत्रसंचालन जेके इंडिया ई-अॅग्रीटेक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरामन थियागराजन यांनी केले.
जैवइंधन स्वीकारण्यात सरकार आणि उद्योगाची महत्त्वाची भूमिका…
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी सांगितले की, भारतातील जैवइंधन स्वीकारण्यामागे सरकार आणि उद्योग क्षेत्रातील समन्वयाचे मोठे योगदान आहे.“जैवइंधन हा एक चांगला पर्याय आहे. सरकार इथेनॉल मिश्रण कार्यक्रम वेगाने पुढे नेत आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असे गुलाटी म्हणाले.त्यांनी सांगितले की, तेल विपणन कंपन्या (OMCs) आणि वाहन उत्पादक कंपन्या (OEMs) सरकारसोबत समन्वय साधून या परिवर्तनाला गती देत आहेत. गुलाटी यांच्या मते, सरकार ग्राहकांच्या अडचणींचीही जाणीव ठेवून कर, किंमत आणि परवडणाऱ्या वाहतुकीसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. “सरकार EV आणि FFV या दोन्ही तंत्रज्ञानांना समान वागणूक देण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भारताच्या प्रगतीत इथेनॉलची महत्त्वाची भूमिका…
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) चे कार्यकारी संचालक प्रशांत बॅनर्जी यांनी सांगितले की, भारताच्या वाहतूक क्षेत्रातील परिवर्तन आणि आर्थिक विकासात इथेनॉलची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. “भारताच्या गतिशीलतेमध्ये आणि विकासामध्ये इथेनॉलची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे,” असे बॅनर्जी म्हणाले. त्यांनी सांगितले की वाहन उद्योग सरकारकडे इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांनाही इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच प्रोत्साहन देण्याची मागणी करत आहे. “आम्ही सरकारकडे जीएसटी कमी करण्याची मागणी करत आहोत. EV ला मिळणारे लाभ इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांनाही मिळायला हवेत,” असे त्यांनी सांगितले.
भारतासाठी बहुइंधन मॉडेलच योग्य…
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख हरीश मेहता यांनी सांगितले की, भारताच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य कोणत्याही एका तंत्रज्ञानावर आधारित असणार नाही. त्यांनी नमूद केले की सीएनजीला न्यायालयीन आणि नियामक हस्तक्षेपामुळे चालना मिळाली, तर जैवइंधनाचा विकास मुख्यतः सरकारी धोरणांमुळे झाला आहे. “सीएनजीला न्यायालयीन हस्तक्षेपामुळे गती मिळाली, तर जैवइंधनाचा विकास धोरणांच्या माध्यमातून झाला,” असे ते म्हणाले.
भारताच्या विशाल बाजारपेठेचा आणि विविध गरजांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, देशाला एकाच उपायाऐवजी अनेक पर्यायांची आवश्यकता आहे. “भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वाहन बाजार आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे बहुइंधन पर्याय आवश्यक आहेत आणि ते भारतात यशस्वी ठरणार आहेत,” असे मेहता म्हणाले. भविष्यातील प्रोत्साहन योजनांबाबत बोलताना त्यांनी तंत्रज्ञान-तटस्थ दृष्टिकोनाचा आग्रह धरला. “प्रोत्साहनांचा विचार तंत्रज्ञान-तटस्थ दृष्टीकोनातून झाला पाहिजे. सर्व तंत्रज्ञानांनी एकत्रितपणे पुढे जाणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
संतुलित दृष्टिकोनच ठरवेल भारताच्या वाहतुकीचे भविष्य…
या चर्चेतून हे स्पष्ट झाले की, भारतातील स्वच्छ वाहतूक क्रांती केवळ इलेक्ट्रिक वाहनांपुरती मर्यादित राहणार नाही. ऊर्जा सुरक्षा, कार्बन उत्सर्जनात घट आणि ग्राहकांचा व्यापक स्वीकार मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉल-आधारित वाहने आणि इतर पर्यायी इंधन तंत्रज्ञानांचा समतोल वापर आवश्यक राहील.


















