हरियाणा : ऊस दर निश्चितीस उशीर, आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनांचा निर्णय

चंदीगढ : हरियाणातील शेतकरी संघटनांनी सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामामध्ये उसाचे राज्य समर्थन मूल्य (SAP) निश्चित करण्यास सरकारकडून होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनच्यावतीने (चारुनी) १२ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व साखर कारखान्यांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. याशिवाय, जर सरकारने एसएपी वाढवून ४०० रुपये प्रती क्विंटल केली नाही, तर १५ डिसेंबरपासून आंदोलन करण्याची घोषणा बीकेयू (टिकैत) हरियाणाने केली आहे. या मुद्यावर त्यांनी ११ डिसेंबर रोजी यमुनानगर जिल्ह्यातील विलासपूरमध्ये एका बैठकीचे आयोजन केले आहे. सरकारला शेतकऱ्यांची कोणतीही चिंता नाही, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. गेल्या महिन्यात सर्व खासगी तसेच सहकारी साखर कारखान्यांकडून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे, मात्र सरकार SAP ची घोषणा करण्यास टाळाटाळ करीत आहे असे त्यांनी सांगितले.

भारतीय किसान युनियनचे (चारुनी) अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी सांगितले की, सरकारने अद्याप SAP निश्चित केलेली नाही, हे दुर्दैव आहे. पंजाब सरकारने आधीच ३८० रुपये प्रती क्विंटल SAP जाहीर केली आहे. मात्र, हरियाणा सरकारने अद्याप SAP ची घोषणा केलेली नाही, हे सरकारचे अपयश आहे. आम्ही १२ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व साखर कारखान्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत. ते म्हणाले की, शेतकरी सर्व साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत निदर्शने करतील. आणि त्यानंतर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देतील.

हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, SAP निश्चित करण्याबाबतच्या समितीशी संलग्न अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हरियाणा सरकार ऊस दर ३८० रुपयांपेक्षा अधिक देण्याबाबत विचार करीत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसएपी वाढविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित आहे आणि लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here