नवी दिल्ली: अमेरिकन रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने आर्थिक वर्ष २०२४ साठी भारताच्या वाढीचा अंदाज ६.३ टक्के राखला आहे. कठोर आर्थिक धोरण आणि निर्यातीत कमकुवतपणा असूनही, भारतीय अर्थव्यवस्था लवचिकता दर्शवित आहे, असे फिचने म्हटले आहे. याशिवाय, अल निनोच्या धोक्यामुळे वर्षाच्या अखेरीस महागाई वाढू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच, पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी ७.८ टक्के होता. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष २५ मध्ये भारताचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे असे फिचने स्पष्ट केले. दुसऱ्या म्हणजेच जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी, फिचने वाढीचा वेग कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमकुवत निर्यात धोरण हे याचे कारण आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक उत्पन्न आणि रोजगाराच्या शक्यता देखील कमी राहण्याची शक्यता आहे.
फिचने म्हटले आहे की, जागतिक आर्थिक मंदीपासून भारत सुरक्षित राहणार नाही. गेल्यावर्षी आरबीआयच्या २५० बीपीएस वाढीच्या विलंबित परिणामाचा फटका देशांतर्गत अर्थव्यवस्थेला बसेल. खराब पावसाळ्यामुळे आरबीआयचे महागाई नियंत्रण गुंतागुंतीचे होऊ शकते, असे अनुमानही वर्तविण्यात आले आहे.