माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राजन यांच्यामुळेच सार्वजनिक बँका डबघाईला: निर्मला सीतारामन

न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकार्दीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती खूपच वाईट होती, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. येथील कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समधील व्याख्यानात त्या म्हणाल्या की, या दोघांमुळे त्या काळात थकीत कर्जांचे प्रमाण प्रचंड वाढून सरकारी बँकांची स्थिती पार बिघडली.

आपण सरकारी बँकांची बिघडलेली घडी पुन्हा नव्याने बसविण्यावर प्राधान्य देणार आहोत. डॉ. राजन यांच्याविषयी मला अतीव आदर आहे. पण ते आरबीआयचे गव्हर्नर असताना बँकांनी वाटेल तशी कर्जे वाटली. त्यांची कर्जफेड झाली नाही. थकीत कर्जांचे प्रमाण वाढण्यास तेच जबाबदार आहेत. सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या स्थितीत असताना डॉ. राजन यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवड झाली. पण त्यांच्या काळात थकीत कर्ज व घोटाळ्यांमुळे सरकारी बँकांची घसरण सुरू झाली, ही वस्तुस्थिती आहे.

राजन यांच्या काळात केवळ एका फोनवर अनेक कर्जे मंजूर झाली. त्यामुळे सरकारी बँका डबघाईला आल्या. ही सर्व माहिती आता बाहेर येत आहे. या बँकांचे गाडे रुळावर आणावे लागेल. या बँका त्यासाठी केंद्र सरकारवरच अवलंबून आहेत. त्यामुळेच रघुराम राजन आज जे काही बोलतात, त्याविषयी आपणास शंका येते, असे सांगून अर्थमंत्री म्हणाल्या की, माजी पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग व डॉ. रघुराम राजन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच सार्वजनिक बँकांची थकीत कर्जे 9190 कोटी रुपयांवरून 2.16 लाख कोटींवर गेली, हे विसरून चालणार नाही, अशा शद्बात त्यांनी प्रत्युत्तर दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here