गोवा: बंद संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

फोंडा : संजीवनी साखर कारखाना बंद आहे. तो पुन्हा इथेनॉल प्रकल्पासह सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी धारबांदोडा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. धारबांदोडा येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ४० मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. संजीवनी कारखान्याच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पोलिस व धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश डायगोडकर यांनी घटनास्थळी सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे सांगून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, निव्वळ आश्वासने न देता या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. साखर कारखान्यात इथेनॉल किंवा साखरेचे उत्पादन कधी सुरू होईल, हे सरकारने सांगावे, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती. आपली नुकसान भरपाई वेळेवर देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची दुसरी मुख्य मागणी होती.शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने कुळे पोलिसांनी संजीवनी साखर कारखाना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्यासह २१० आंदोलक शेतकऱ्यांना अटक केली. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, संजीवनी साखर कारखाना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी, सरकारने या विषयावर चर्चा करून संजीवनी कारखान्याच्या भवितव्याबाबतचा निर्णय सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शेतकऱ्यांना कळवावा अशी मागणी केली. मात्र त्यांच्या प्रश्नाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. चर्चा करण्यासाठी कोणीही न आल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. देसाई म्हणाले की, ऊस उत्पादन हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. राज्य सरकारने २०१९-२० मध्ये नुकसानीचे कारण देत गाळप हंगाम थांबवण्यात आले. आता संजीवनी कारखान्यात इथेनॉल प्रकल्प आणून कारखाना पुनरुज्जीवित करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून इथेनॉल प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here