हरियाणा : ऊस दरास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांची निदर्शने

कर्नाल : राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत शेकडो शेतकऱ्यांनी कर्नालमध्ये निदर्शने केली. भारतीय किसान युनियनचे (टिकेत) राज्य अध्यक्ष रतन मान यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भाजप आमदार हरविंदर कल्याण यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मागणी केली की, सरकारने ऊस दर सध्याच्या ३६२ रुपये प्रती क्विंटलवरून ४५० रुपये प्रती क्विंटल केला पाहिजे. राज्य सरकारकडून ऊस दराची घोषणा करण्यास उशीर होत असल्याने साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना बिले दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रतन मान यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच सरकारने गाळप सुरू झाल्याच्या एक महिन्यानंतरही उसाच्या दराची घोषणा केलेली नाही.

शेतकऱ्यांनी आरोप केला की, अधिकाऱ्यांनी आधीच शेजारील पंजाब राज्यात दिल्या जात असलेल्या प्रती क्विंटल ३८० रुपयांपेक्षा अधिक ऊस दर वाढीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून उशीर केला जात असल्याने राज्यभरातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आमदार कल्याण यांना आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केले आणि जर सरकार पुढील दोन दिवसांत निर्णय घेण्यात अपयशी ठरले तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here