नवी दिल्ली : उत्तर भारतात मुसळधार पाऊस आणि पुराने हाहाकार माजला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे रस्ते खचले आहेत. घरांची पडझड झाली आहे आणि वाहतूक प्रचंड कोंडी झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. राज्यातील डोंगराळ प्रदेशात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. आतापर्यंत किमान 88 लोक मरण पावले आणि 100 हून अधिक जखमी झाले. पुराच्या पाण्यात अनेक कार, बस, पूल आणि घरे वाहून गेली आहेत.
उत्तर प्रदेश पावसाशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य सरकारचे प्रवक्ते शिशिर सिंग यांनी दिली. १२ पैकी नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला, दोघांचा विजेचा धक्का लागून आणि एकाचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याचे सिंग यांनी सांगितले.
शनिवारपासून हिमाचलमध्ये अडकलेल्या सुमारे 300 लोकांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. ज्यात बहुतांश पर्यटकांचा समावेश होता. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले की, राज्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सुमारे 170 घरे कोसळली आणि आणखी 600 अंशतः नुकसान झाले.
नवी दिल्लीत यमुना नदीजवळील निवासी भागात पाणी शिरले. रस्ते, गाड्या आणि घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे सखल भागातील हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, यमुना नदीच्या पाण्याची पातळी 40 वर्षांचा विक्रम पार करून बुधवारी 207.71 मीटर वर पोहोचली. सुमारे 30,000 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवले आहे आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या भागातील काही शाळांना मदत छावण्यांमध्ये रूपांतरित केले आहे.
पूरग्रस्त भागात राहणाऱ्या दिल्लीकरांना आवाहन करत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. नवी दिल्लीत गेल्या दोन दिवसांत फारसा पाऊस झालेला नाही, परंतु शेजारच्या हरियाणातील हथिनी कुंडमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने नदीची पातळी वाढली आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय राजधानीतील सुमारे 25 टक्के पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, परंतु उद्यापासून या भागांना पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.