बांगलादेशला भारत साखरेसह सात जीवनावश्यक वस्तू पुरवणार : वाणिज्य मंत्री टीपू मुंशी

ढाका : बांगलादेश-भारत सीमेवरील व्यापारी चौक्या कोविड महामारीमुळे बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक व्यापार चौकी सुरू असून दुसरी लवकरच सुरू करण्यात येईल, असे बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टीपू मुन्शी यांनी सांगितले. बांगलादेश – भारत वाणिज्य मंत्रीस्तरीय बैठकीनंतर, मंत्री मुन्शी यांनी प्रसार माध्यमांच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सीमेवरील केंद्रे पुन्हा सुरू करण्याच्या भारताच्या सूचनेला बांगलादेशने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
बांगलादेश – भारत वाणिज्य मंत्री स्तरीय बैठक २२-२३ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती.
याबाबतच्या पत्रकार परिषदेत मुन्शी यांनी सांगितले की, भारताने बांगलादेशला तांदूळ, गहू, साखर आणि कांद्यासह सात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. संभाव्य अन्न संकटाचा सामना करण्यासाठी तांदूळ, गहू, साखर आणि कांद्यासह सात जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडे वार्षिक कोटा सुविधा मागितली आहे. भारत आमच्या गरजेनुसार, आयात कोटा निश्चित करण्यास तयार झाले आहेत.
वार्षिक कोट्याबाबत मुन्शी यांनी सांगितले की, भारताने बांगलादेशच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की ते बांगलादेशच्या मागणीचा आणि आपल्याकडील उपलब्धतेचा आढावा घेवून पुढील दोन महिन्यात कोटा निश्चित करतील. त्यांनी सांगितले की, या बैठकीवेळी बांगलादेशने भारताकडे बांगलादेशी ज्युटच्या साहित्यावर २०१७ च्या पूर्वी लावण्यात आलेले डंपिंग विरोधी शुल्क मागे घेण्याची मागणी केली. भारताने याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. मंत्री मुन्शी म्हणाले की, बांगलादेश आणि भारत, दोन्ही किमान व्यापक आर्थिक भागिदारी करारावर (सीईपीए) स्वाक्षरी करण्यास तयार झाले आहेत. लवकरात लवकर या करारावर स्वाक्षरी केली जाईल. यादरम्यान, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही देश लवकरात लवकर व्यापार कराराबाबत चर्चा करण्यास तयार झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here