भारताकडून अफगाणिस्तानला १०,००० मेट्रिक टन गव्हाची मदत

काबुल : गंभीर अन्न संकटाशी झुंज देणाऱ्या अफगाणिस्तानला भारताने १०,००० मेट्रिक टन गव्हाची मदत केली आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फॉर फूड प्रोग्रॅम (युएनडब्ल्यूएफपी) ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, १०,००० मेट्रिक टन गहू मंगळवारी अफगाणिस्तानातील हेरात शहरात पोहोचवण्यात आला. युएन डब्ल्यूएफपीने ट्विट करुन म्हटले आहे की, भारत सरकारकडून मदत म्हणून मिळालेला गहू हेरातमध्ये पोहोचला आहे. तेथून अफगाणिस्तानमध्ये भुकेल्या कुटुंबांना वितरीत करण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी २०२२ मध्ये भारताने अफगाणिस्तानला ४०,००० टन गव्हाची मदत केली होती.

अफगाणिस्तानमधील खामा प्रेसने म्हटले आहे की गेल्या महिन्यात भारत सरकारने ईराणच्या चाबहार बंदरातून देशातील मानवी संकटादरम्यान, अफगाणिस्तानला २०,००० मेट्रिक टन गहू पाठवला होता. यापूर्वी ४०,००० टन गव्हाची मदत पाकिस्तानमार्गे करण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील स्थिरता आणि समृद्धीसाठी भारताने आपले योगदान दिले आहे असे खामा प्रेसने म्हटले आहे.

तालिबानच्या अधिन अफगाणिस्तान सध्या अत्यंत बिकट स्थितीत आहे. देशातील महिलांना मौलिक अधिकारांपासून वंचित करण्यात आले आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या आकलानानुसार अफगाणिस्तान अत्याधिक अन्न असुरक्षा असलेल्या देशांपैकी एक आहे. नऊ दशलक्ष लोक गंभीर आर्थिक परिस्थिती आणि भुकेने त्रस्त आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here