जालना : कंडारी (अंबड) येथील ब्ल्यू सफायर फुड प्रोसेसिंग प्रा. लि. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा वाढीव हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. २०२५-२६च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसापोटी ही रक्कम देण्यात आली असून, आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला एकूण ऊसदर प्रतिटन २ हजार ९०० रुपये झाला आहे. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर वाढीव रक्कम थेट खात्यावर जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात होणाऱ्या खर्चासाठी ही रक्कम आर्थिक आधार ठरणार आहे.
आमदार हिकमत उढाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना योग्य मोबदला आणि वेळेत ऊसबिले देण्याची भूमिका कारखाना व्यवस्थापनाने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, आगामी काळातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
‘ऊस उत्पादक शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रतिटन १०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य मोबदला मिळणे ही आमची भूमिका असून, भविष्यातही शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,’ असे आमदार हिकमत उढाण यांनी सांगितले.


















