बेळगाव : येथील श्री हालसिद्धनाथ को-ऑप. शुगर फॅक्टरी लि, (मल्टि-स्टेट) निपाणी कारखान्याच्या सभासद तसेच कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत व उपाध्यक्ष गीता पाटील यांनी दिली. ते म्हणाले, कारखान्याचे सभासद व कर्मचारी यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी कारखान्याकडून शिष्यवृत्ती वितरण योजना राबविण्यात येत आहे. कारखान्याचे मार्गदर्शक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद आणि कर्मचारी यांच्या पात्र मुलांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करुन देत त्यांच्या उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी कारखाना सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन समाज व राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, या उदात्त हेतूने ही शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तरी कारखान्याचे सर्व सभासद व कर्मचारी यांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी विहित अर्ज भरुन, संबंधित स्थानिक संचालकांची शिफारस व स्वाक्षरी घेऊन आवश्यक कागदपत्रांसह कारखान्याच्या कार्यालयात ३१ जुलै पर्यंत सादर करावे, असे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्तीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्जाचा नमुना तसेच इतर माहितीसाठी कारखान्याच्या कृषी खात्याच्या सेंटर ऑफिस किंवा मुख्य प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा लाभ सर्व सभासद व कर्मचारी यांच्या मुलांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


















