सातारा : पडळ कारखाना योग्य नियोजनामुळे प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरल्यामुळे अनेक प्रोजेक्ट उभे राहात आहेत. या वर्षी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचा कारखान्याचा मनोदय असून, बायोगॅसच्या माध्यमातून विविध वाहनांना मिळणारा गॅस, सिलिंडर, त्याचप्रमाणे शेतीस उपयुक्त खतनिर्मिती केली जाणार आहे. लवकरच कारखाना बायोगॅस प्रकल्पाच्या कामास सुरुवात करीत असल्याचे खटाव-माण अॅग्रो प्रोसिसिंग कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.
पडळ (ता. खटाव) येथे आठव्या गळीत हंगामाच्या बॉयलर प्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी आमदार मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, विक्रम घोरपडे, प्रीती घार्गे-पाटील, महेश घार्गे, राहुल पाटील, कृष्णत शेडगे, आण्णासाहेब निकम, धनाजी जाधव, अमोल पवार, जयवंत जाधव, युवराज साळुंखे, नरेंद्र साळुंखे, मंगला घोरपडे, समता घोरपडे, अजय सानप, सरव्यवस्थापक काकासाहेब महाडिक आदी उपस्थित होते. आमदार घोरपडे म्हणाले, “आजअखेर कारखान्याने ऊसतोडणी, वाहतूक, कामगार, शेतकऱ्यांचे ठरल्याप्रमाणे बिले दिली आहेत. यावर्षी पावसाचे संकट असले, तरीही उपलब्ध कच्च्या मालावर क्रशिंग करून कारखान्याची परंपरा कायम ठेवली जाईल, तसेच इतर कारखान्यांप्रमाणेच शेतकऱ्यांना उसास योग्य दर दिला जाईल.” संग्राम घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. काकासाहेब महाडिक यांनी आभार मानले.


















