कोल्हापूर : कुंभी- कासारी कारखान्याच्यावतीने सभासदांना १० रुपये दराने सवलतीची साखर – आमदार, अध्यक्ष चंद्रदीप नरके यांची घोषणा

कोल्हापूर: कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेत ऊसपुरवठा न करणाऱ्या सभासदांना सवलतीच्या साखरेचा २५ रुपये दर केला होता; पण या धोरणात बदल करून सभासदांनी ऊस पुरवठा केल्यास साखर दहा रुपयांप्रमाणे दिली जाईल, अशी घोषणा अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. सभेत राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, करवीरसह वगळलेल्या पाच तालुक्यांचा दुष्काळी म्हणून जाहीर करावा आणि साखरेचा दर प्रतिकिलो ५० रुपये करावा या मागणीचे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत निवास पाटील, पुंडलिक पाटील, भीमराव नाळे, राजेंद्र सूर्यवंशी, आदी सहभागी झाले.

अध्यक्ष नरके यांनी गेल्यावर्षी कारखान्याने ४ लाख ८८ हजार टन ऊस गाळप करून १२.५५ टक्के उतारा घेऊन ६ लाख १३ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तोडणी वाहतूक खर्च वजा जाता ३,५६० रुपयांप्रमाणे ऊसदर अदा केला आहे अशी माहिती दिली. यावेळी बाळासाहेब खाडे यांनी, गतवर्षीच्या तुलनेत १२५ कोटी कर्ज वाढले असल्याबद्दल विचारणा करत गतवर्षीच्या तुलनेत सहवीज प्रकल्प व डिस्टीलरीचा नफा ५० टक्के कमी झाला आहे. व्यवस्थापनात बदल करायला हवा, अशी सूचना केली. अमर पाटील यांनी, आधुनिकीकरण करूनही अपेक्षित गाळप उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे, असा आरोप केला. तर नामदेव पाटील यांनी प्रेसमड चोरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही, असा आरोप केला. यावर नरके म्हणाले, गाळप कमी झाले, एफआरपी वाढली, साखरेला दर मिळाला नाही, गेल्या पाच वर्षात साखरेचा दर सरासरी २५ रुपये राहिला आहे. उसाला मात्र सरासरी ३,३०० दर द्यावा लागला आहे. कारखान्याचा कारभार काटकसरीने करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here