भोपाळ / बेंगळुरू : सनब्रिज ग्रुपची जैवऊर्जा क्षेत्रातील कंपनी सनब्रिज बायोएनर्जी लिमिटेडने मध्य प्रदेशातील सिवनी येथील धान्यआधारित इंधन इथेनॉल प्रकल्पात व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. द हिंदू बिझनेसलाइनने याबाबत वृत्त दिले आहे. या प्रकल्पाची दररोज 300 किलोलीटर (KLD) इथेनॉल उत्पादन क्षमता असून, साठवणूक क्षमता 11,000 किलोलीटर आहे. हा प्रकल्प सुमारे 1,17,560 चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीने निवेदनाद्वारे दिली.
कंपनीची एकूण एथेनॉल क्षमता 700 KLD होणार
सनब्रिज बायोएनर्जी इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यावरही भर देत आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील 400 KLD क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता 700 KLD पर्यंत पोहोचणार आहे. सिवनी येथील प्रकल्पाची रचना इथेनॉल उत्पादन प्रक्रियेत उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. या प्रकल्पातून एथेनॉलसोबतच डिस्टिलर्स ड्राइड ग्रेन्स विथ सॉल्युबल्स (DDGS) आणि डिस्टिलर्स कॉर्न ऑइल (DCO) यांसारख्या उपउत्पादनांचेही उत्पादन केले जाते. DDGS आणि DCO चा प्रामुख्याने पोल्ट्री आणि पशुखाद्य म्हणून वापर केला जातो.
पाण्याचा पुनर्वापर; झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली
प्रकल्पात पाण्याची पुनर्प्राप्ती आणि पुनर्वापर करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. या प्रकल्पाचे संचालन झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्रणालीअंतर्गत केले जाते. त्यामुळे पाण्याची नासाडी कमी करण्यासोबतच नैसर्गिक संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास मदत होते. सनब्रिज ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष अनुज अग्रवाल यांनी सांगितले की, सिवनी येथे इथेनॉल उत्पादन सुरू होणे हे कंपनीच्या जैवऊर्जा क्षेत्रातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
ते म्हणाले, “ऊर्जा आणि संसाधन कार्यक्षमतेचा समन्वय साधणारे, विस्तारक्षम जैवऊर्जा व्यासपीठ उभारण्यावर आमचा भर आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अर्थपूर्ण मूल्य निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ”सिवनी प्रकल्प हा या प्रवासाची सुरुवात असल्याचे सांगत अग्रवाल यांनी भारतातील जैवऊर्जा क्षेत्राचा विकास होत असताना या क्षेत्रात विस्ताराच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले. शाश्वत ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाला हातभार लावण्याबरोबरच जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

















