मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडला काँग्रेसचा ‘हात’; पाच राज्यांत भाजपचे‘कमळ’ कोमेजले

486

नवी दिल्ली : चीनी मंडी 

आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला ‘जोरका झटका’ देत काँग्रेसने तीन राज्यांत सत्तांतर घडवून आणले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आला आहे. यात मध्य प्रदेशमध्ये फक्त काँग्रेसला एक-दोन जागांसाठी इतरांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. यासह तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीने निर्विवादपणे सत्तेला गवसणी घातली असून, मिझोराममध्ये मिझोराम नॅशनल फ्रंटने सर्वाधिक जागा पटकावून बाजी मारली आहे.

राजस्थानमध्ये नागरिकांचा कौल पहिल्यापासून वसुंधरा राजे यांच्या विरोधात होता.‘मोदी तुझसे बैर नही, राजे तेरी खैर नही,’ अशी घोषणा राजस्थानमध्ये देण्यात येत होती. मतदारांनी ते खरी ठरवून दाखवली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार १५ वर्षे सत्तेत असल्यामुळे अँटी इन्क्मबन्सीचा फटका शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारला बसला. ‘व्यापम’ गैरव्यवहार तसेच शेतकऱ्यांवर झालेला लाठिमार या घटनाही त्यांच्या विरोधात कौल जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. तर, छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना काँग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्याला जनतेने प्रतिसाद दिल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत केंद्रात राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे, असा प्रचार भाजपने करून सत्ता मिळवली होती. त्याला यावेळी मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेलंगणमध्ये मात्र काँग्रेसने तेलगु देसम पार्टी सोबत केलेली आघाडी फारशी चालली नाही. तरी काँग्रेसने तेथे भाजपला मागे टाकण्यात यश मिळवले आहे. मिझोराममध्येही भाजपचा करिष्मा चाललेला नाही. तेथेही काँग्रेसला काही जागांवर यश मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील सत्ताधारी भाजपला एकाही राज्यात सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेषतः सर्वाधिक जागा असलेल्या हिंदी भाषिक पट्ट्यात होणारे नुकसान भाजपला परवडणारे नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील जवळपास सर्व जागा जिंकून भाजपने २०१४च्या निवडणुकीत दिल्लीत सत्ता मिळवली होती. त्यामुळे या दोन राज्यांतील पराभव भाजपसाठी चिंता करायला लावणारा नक्कीच आहे. ‘भाजपने आत्मपरिक्षण करावे,’ असा सल्ला त्यांना त्यांच्याच मित्रपक्षांकडून मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला यांनी पदाचे राजीनामे दिल्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आले आहे. त्यातच पाच राज्यांत एकाही ठिकाणी समाधानकारक निकाल न लागल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

आकडे बोलतात

राजस्थान

एकूण जागा – १९९

काँग्रेस – १००

भाजप – ७३

आरएलएम – ३

इतर – २३

 

मध्य प्रदेश

एकूण जागा – २३०

काँग्रेस – ११४

भाजप – १०७

बसप – २

इतर – ७

 

छत्तीसगड

एकूण जागा – ९०

काँग्रेस – ६३

भाजप – १८

जेसीसी – ९

तेलंगण

एकूण जागा – ११९

तेलंगण राष्ट्रसमिती-एमआयएम – ९४

काँग्रेस-टीडीपी – २२

भाजप – १

इतर – २

 

मिझोराम

एकूण जागा – ४०

मिझोराम नॅशनल फ्रंट – २६

काँग्रेस – ५

भाजप – १

इतर – ८

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here