महाराष्ट्र : अतिवृष्टिबाधित क्षेत्रात ऊस पिकाचे नियोजन करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

कोल्हापूर : सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात, ऊस उत्पादक पट्टयात अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले. पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. पूरबाधित क्षेत्रामध्ये ऊस पीक काही उंचीपर्यंत पाण्यात बुडाल्याने किंवा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने तसेच ऊस लागवडीत पाणी साचून राहिल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. ऊस उत्पादनात घटीची शक्यता असते. दीर्घकाळ पाणी राहिल्यास ऊस आडवा पडणे किंवा पूर्ण सुकण्याची शक्यता असते. ऊस व साखर उत्पादनामध्ये घट येते. बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. पुराचे पाणी जास्त दिवस राहिल्यामुळे जमिनीची सच्छिद्रता कमी होऊन जमिनीची जैविक सुपीकता कमी होते. उपलब्ध अन्नद्रव्ये पुराच्या पाण्यात वाहून जातात. त्यामुळे ऊस लागवडीसाठी जलद व उंच वाढणाऱ्या को-८६०३२ सास्ख्या ऊस जातींची निवड करावी, पूरबाधित क्षेत्रात उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

याबाबत प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्राच्या अखिल भारतीय समन्वित काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पातील डॉ. दीपक सावळे, महेंद्र वळसे, डॉ. गोविंद येणगे, डॉ. विद्यासागर गेडाम यांनी सांगितले आहे की, पूरबाधित किंवा नदीबूड क्षेत्रात पूर्व हंगामात म्हणजेच १५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ऊस लागवड करावी. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या जास्त पावसाच्या कालावधीत उसाचे पीक पुराच्या पाण्याखाली न जाता केवळ वाढे (शेंडा) पुराच्या पाण्यावर राहतील. परिणामी पुरामुळे होणारे उसाचे नुकसान कमीत कमी होईल.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत, जोडओळ पद्धत, रुंद सरी पद्धत, लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा. पुरामुळे पडलेले ऊस उभे करून बांधून घ्यावेत. पुरबुडीत क्षेत्रातील उसाचे वाढे संपूर्ण पाण्यात राहून कुजले असल्यास, असे ऊस जमिनीलगत छाटून शेताबाहेर काढावेत. अशा जमिनीत गहू, हरभरा, सूर्यफूल किंवा भाजीपाल्याची पिके हंगामानुसार घ्यावीत. रासायनिक खतमात्रा लगेच जास्त देणे टाळावे. पूरबुडीत क्षेत्रातील उसाची लागवड डिसेंबर-जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केली असल्यास, शिफारशीच्या २५ टक्के नत्र, स्फुरद व पालाश खते पूर ओसरल्यानंतर वाफशावर सरीमधून दिल्यास उसाची वाढ उत्तम होते. अतिवृष्टी व पूरबुडीत क्षेत्रातील उसासाठी झिंक सल्फेट एकरी ८ ते १० किलो प्रमाणे शेणखतामध्ये अथवा गांडूळ खतामध्ये मिसळून द्यावे असे सुचविण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here