नांदेड : जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी साखरेचा घाऊक दर पाच हजार १५० रुपये क्विंटल होता. त्यानंतर दरात सातत्याने वाढ होत सध्या साखरेचा घाऊक भाव सहा हजार ८०० रुपये क्विंटलपर्यंत पोचला आहे. सुमारे २० दिवसांत ही १७ रुपयांची विक्रमी दरवाढ झाली आहे. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी ५१ रुपये किलो असलेली साखर आता ६८ रुपये किलोवर पोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संसाराच्या बजेटला मोठी झळ बसत आहे. गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेला चांगली मागणी असतानाच दर वाढल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यंदा साखरेचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढले असतानाही दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. साखरेच्या दरवाढीचा परिणाम गुळावरही झाला आहे. सध्या गूळ ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. गुळाच्या दरात गेल्या दहा दिवसांत किलोमागे १५ रुपयांनी वाढ झाली. बाजारात पुरवठा कमी असल्याने मालाचा तुटवडा जाणवत आहे. साखरेचे दर वाढल्याने गुळाचे दर सुद्धा वाढले आहेत.


















