सोनई : राज्यातील साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कारखाना स्तरावरील कामगार संघटना अधिक सक्षम होणे गरजेचे असून, राज्य संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, अशी ग्वाही प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीची आढावा बैठक शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांच्या थकीत पगाराबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस राऊ शंकर पाटील यांनी राज्यातील साखर कामगारांचे सुमारे एक ते दोन हजार कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. प्रत्येक कामगार संघटनेने आपल्या जिल्ह्यातील खासदार व आमदार यांची भेट घेऊन हा प्रश्न शासनापुढे प्रभावीपणे मांडावा, असे आवाहन केले.
यावेळी विधानसभेत सहकारी साखर कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्याची मागणी करणारे आमदार चंद्रदीप नरके यांचे सर्व कामगार संघटनांच्यावतीने आभार मानण्यात आले. बहुसंख्य कामगारांचे वेतन थकीत असल्यामुळे सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्याचे ठरले. प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष तथा समन्वय समितीचे सरचिटणीस डी. एम. निमसे यांनी प्रास्ताविक केले. मुळा कारखाना युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यांनी स्वागत केले. आनंद वायकर, अविनाश आपटे, ज्ञानदेव पाटील आहेर, रवी तांबे, कैलास जाधव, नितीन गुरसळ, मनोहर शिंदे आणि शेषनारायण मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस सुभाष सोनवणे, एकनाथ जगताप, अमोल वाळुंज, नंदू गवळी, भरत लगड, अशोक पारखे, बाळासाहेब आहेर, नानासाहेब कुंजीर, प्रकाश आवारे, विरेंद्र जाधव यांसह विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशोक आरगडे यांनी आभार मानले.


















