महाराष्ट्राचा साखर उद्योग तीन वर्षात उलाढालीचा अडीच लाख कोटींचा टप्पा गाठणार

पुणे / कोल्हापूर : राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारा साखर उद्योग प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहे. 2022 – 2023 हंगामात नैसर्गिक आपत्तीच्या काळातही तब्बल 1 लाख 8 हजार कोटींची उलाढाल करण्यात यशस्वी झाला. साखरेबरोबरच इथेनॉल, वीज, कॉम्प्रेस्ड बायो गॅस, ग्रीन हायड्रोजन अशा विविध उत्पादनामुळे पुढील तीन वर्षात महाराष्ट्राचा साखर उद्योगाची एकूण उलाढाल अडीच ते तीन लाख कोटींवर जाईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. असे झाले तर जागतिक साखर उद्योगाचे नेतृत्व आगामी काळात महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे.पुणे येथे सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीही राज्याच्या साखर कारखानदारीची उलाढाल पुढील काही हंगामांत अडीच लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असे भाकित केले आहे.

याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) चे कार्यकारी संचालक अजित चौगुले म्हणाले कि, यंदा उसाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसूनही राज्यात 105.27लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 130 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्यात साखर कारखान्यांना यश आले आहे. त्याचबरोबर काही उपपदार्थांची निर्मिती करण्यात आली. या सर्वातून यंदा साखर उद्योगाची एकूण उलाढाल 1 लाख 8 कोटींवर गेली आहे. चौगुले म्हणाले, आग्गामी तीन वर्षात उसाचे क्षेत्र आणि उत्पादनात वाढ, साखरेबरोबरच इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, वीज यासारख्या उपपदार्थांच्या निर्मितीतून साखर उद्योगाच्या उलाढालीत मोठी भर पडणार आहे. त्यातून अडीच लाख कोटींची उलाढाल शक्य असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

उपपदार्थांतून उत्पन्नात भर…

केंद्र सरकारने 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी साखर कारखान्यांना फार मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. साखरेबरोबरच इथेनॉल उत्पादनातही साखर कारखाने भरारी घेताना दिसत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा 130 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन केले आहे. त्यातून कारखान्यांच्या उत्पन्नातही चांगलीच भर पडली आहे. आगामी काळातही साखर उद्योगाच्या उलाढालीत कॉम्प्रेस्ड बायो गॅस, ग्रीन हायड्रोजन हे घटकही मोठी भर घालणार आहेत.

यंदाचा हंगाम दृष्टीक्षेपात…

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील उस उत्पादन प्रती हेक्टरी सरासरी 115 टनावरून 80 ते 85 टन इतके कमी झाले. खोडवा पिकामुळेही उसाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाला. गाळप हंगामात सहकारी आणि खासगी अशा एकूण 210 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता. 15 मेपर्यंत च्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 1053.66 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. या हंगामात राज्यातील 33477 कोटी रुपयांपैकी 32233 कोटी रुपये (96.28 टक्के) अदा करण्यात आले आहेत. राज्यात प्रत्यक्ष एफआरपी 1244 कोटी रुपये शिल्लक आहे. 105 कारखान्यांनी 100 टक्के बिले अदा आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here