पूर्ण देशभरात पोहोचला मान्सून, दिल्ली, युपीतही पाऊस

नवी दिल्ली : दिल्लीत पावसामुळे हवामान थंड झाले आहे. गुजरातमध्ये पाऊस सुरू असून पश्चिम बंगालमध्ये रथयात्रेदरम्यान वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. युपीसह बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांत पाऊस सुरू आहे. हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिन्यात मान्सून गती घेईल. जुलै महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याचे अनुमान आहे. गुजरात, राजस्थानमध्ये हंगामी पावसाला सुरुवात झाल्यानंतर दक्षिण-पश्चिम मान्सूनने देशभरात हजेरी लावली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ही माहिती दिली आहे.

प्रभात खबरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, आठ जुलै रोजी सामान्य स्थितीपूर्वी सहा दिवस आधी, शनिवारी दक्षिण-पश्चिम मान्सून देशभरात पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत हलका ते मध्यम पावसाने देशभरातील अनेक भागात पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. दिल्लीतही पाणी साठले आहे. मुंबईत चुनाभट्टी परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने चार घरांची पडझड झाली. मात्र, यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. झारखंडमधील पलामू जिल्ह्यात पुढील काही तासात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राजधानी रांचीमध्ये मान्सून आल्यानंतर १५ दिवसांनंतर शुक्रवारी जोरदार पाऊस कोसळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here