ओएनजीसीच्या अखत्यारीतले मुंबई हाय म्हणजे देशाची संपत्ती : केंद्रीय पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी

मुंबई हाय अर्थात मुंबईच्या तेलविहीर क्षेत्राची भविष्यातल्या तेल उत्खनन आणि संशोधनात महत्वाची भूमिका असणार आहे असे केंद्रीय पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. ते आज मुंबई हाय डिस्कव्हरीच्या सुवर्ण महोत्सानिमीत्त आयोजीत समारंभात बोलत होते.

मुंबई हाय या मुंबईच्या तेलविहीर क्षेत्राची 50 वर्षांची यशस्वी वाटचाल म्हणजे एक विलक्षण आणि गौरवशाली प्रवास आहे, अशा शब्दांत त्यांनी ओएनजीसीची प्रशंसा केली. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसीने शाश्वततेच्या दृष्टीकोनातून, तसेच तेल उत्खनानाचा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहितीसाठी विश्लेषणासारख्या (डेटा अॅनॅलिटिक्स – Data Analytics) तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पुरी यांनी तेल उत्पादन प्रक्रियेतल्या नव्या शोधांसाठी ओएनजीकडून सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रयत्नांतून देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल यादृष्टीने प्रगतीसाठीचे नवे धोरणात्मक मार्ग आखले जात असल्याचे ते म्हणाले.

ओएनजीसीने समुद्राच्या तळातील गाळ साचून राहिलेल्या खोऱ्यातील तेल उत्खनन प्रक्रियेचे नेतृत्व करावे असे आवाहन पुरी यांनी यावेळी केले. तेल उत्पादनात वाढ व्हावी यासाठी, अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये आवश्यक बदल करणे आवश्यक आहेच मात्र त्याच्या जोडीने अनुभवाची सांगडही घातली गेली पाहीजे ही बाब पुरी यांनी अधोरेखित केली. ओएनजीसीने गोव्यात स्थापन केलेल्या पेट्रोलियम सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण व्यवस्थापन संस्थेच्या (IPSHEM) नव्या शाखेचे पुरी यांनी कौतुक केले. तेल उत्खनन आणि उत्पादन उद्योग क्षेत्रातील (E&P industry) ही जागतिक दर्जाची आणि पंतप्रधानांकडून प्रशंसा मिळवलेली संस्था असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मुंबई हायच्या आजवरच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या माजी नेतृत्वाचा तसेच युवा कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कारही ओएनजीसीच्या वतीने केला गेला. यासोबतच ओएनजीसीची आजवरची वाटचाल, भूतकाळ, वर्तमान उलगडणारा आणि ओएनजीसीचा भविष्याविषयीचा दृष्टीकोन मांडणारा माहितीपटही यावेळी दाखवला गेला. या माहितीपटात अभिनेता परेश रावल यांनी ओएनजीसीशी एकरुप झालेल्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारली होती.

या सोहळ्याच्या स्वागतपर भाषणात ओएनजीसीच्या अध्यक्षांनी उत्पादनातल्या वाढीसाठी गतीशील आराखडा आखला जाईल आणि तेल उत्खननासाठी भरीव गुंतवणुक आणली जाईल असे आश्वासन दिले. मुंबई हाय अर्थात मुंबईच्या तेलविहीर क्षेत्रात आणखी विहिरींचा शोध लावला जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुंबईच्या तेलविहीर क्षेत्रात तेलाचा शेवटचा प्रत्येक थेंब सापडण्याच्या अखेरच्या संधीपर्यंत ओएनजीसी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यासाठी आपल्याकडी उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक आणि पूर्ण क्षमतेने वापर होईल यासाठी ओएनजीसी झोकून देऊन काम करेल ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here