नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी बुधवारी (दि. १६) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘एनसीडीसी’च्या वित्त विभागाचे उपव्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार बन्सल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ‘वसाका’शी संबंधित कर्जप्रकरण, आवश्यक संमती व परवानग्या तसेच पुढील कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यात आला.
कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणी करीत आमदार डॉ. आहेर यांनी कागदपत्रांसह निवेदन सादर केले. बैठकीस ‘एनसीडीसी’च्या साखर विभागाचे संचालक दुबासी, कायदेविषयक उपसंचालक, सहसंचालक व अन्य अधिकारी तसेच वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादितचे विधिज्ञ अॅड. विलास देशमाने उपस्थित होते.
बैठकीत ‘वसाका’ पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली. कर्जप्रकरणाची सद्यस्थिती, कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या व संमती आणि पुढील प्रक्रियेबाबतही विचारविनिमय करण्यात आला. कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.


















