मनिला: फिलिपिन्स सरकार देशांतर्गत बायोइथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी स्वस्त आणि विविध प्रकारच्या कच्च्या मालाचा (फीडस्टॉक) शोध घेत आहे. आयात केलेल्या इंधनाच्या तुलनेत देशांतर्गत इंधनाची स्पर्धात्मकता वाढवणे, तसेच स्थानिक शेतकरी आणि उद्योगांना पाठबळ देणे हा यामागील उद्देश आहे. कृषिमंत्री फ्रान्सिस्को टियू लॉरेल ज्युनियर आणि ऊर्जामंत्री शेरॉन गॅरिन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही विभाग फीडस्टॉकचा खर्च कमी करणे, वापरात नसलेल्या डिस्टिलरी क्षमतेचा उपयोग करणे आणि देशांतर्गत इथेनॉल उत्पादन वाढवण्याच्या उपायांचा आढावा घेत आहेत.
या चर्चेदरम्यान देशातील इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्याच्या 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. दरम्यान, बायोइथेनॉलसाठी फिलिपिन्स राष्ट्रीय मानक अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या मसुद्यावर सार्वजनिक सल्लामसलत सुरू आहे.बायोइथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार मोलॅसिस (उसाचा मळी), उसाचा रस, स्थानिक पातळीवर उत्पादित मका आणि पाम तेल यांचा संभाव्य कच्चा माल म्हणून विचार करत आहे.
कृषिमंत्री टियू लॉरेल यांनी सांगितले की, सरकार या पर्यायांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करत आहे. या पर्यायांमुळे इथेनॉल उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो आणि भविष्यात पेट्रोलच्या किमती कमी करण्यासही मदत होऊ शकते. कृषी विभाग सुधारित बियाणे, यांत्रिकीकरण आणि शेतकरी तसेच इथेनॉल उत्पादक यांच्यातील कराराधारित शेतीच्या माध्यमातून मक्याचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. टियू लॉरेल यांच्या मते, मुख्य अडचण मक्याची उपलब्धता नसून, इथेनॉल उत्पादन व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल अशा दरात त्याचा पुरवठा सुनिश्चित करणे ही आहे.
बायोइथेनॉल तसेच शाश्वत विमान इंधन (SAF) निर्मितीसाठी पाम तेलाचा पर्यायी कच्चा माल म्हणूनही विचार केला जात आहे. मात्र, पामच्या लागवडीला उत्पादनक्षम होण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.उसावर आधारित कच्च्या मालापासून फिलिपिन्समध्ये बायोइथेनॉलचे उत्पादन दरवर्षी अंदाजे 325 दशलक्ष ते 385 दशलक्ष लिटर आहे. याउलट, देशाची स्थापित उत्पादन क्षमता 500 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक आहे.
कच्च्या मालाच्या स्रोतांमध्ये विविधता आणल्यामुळे कोणत्याही एका कृषी उत्पादनावरील अवलंबित्व कमी होईल, विद्यमान डिस्टिलरी क्षमतेचा अधिक चांगला वापर करता येईल आणि देशांतर्गत बायोइथेनॉलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, असा सरकारचा विश्वास आहे.


















