नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना देश बळकट करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले असून, या आवाहनाचा उद्देश सामूहिक सहभागातून जागतिक आव्हानांना तोंड देणे हा असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सी. सेंथिल राजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांनी हैदराबादमधील भाषणात जागतिक संघर्षांमुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडचणी, वाढती महागाई आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, देशात कोणत्याही वस्तूंची कमतरता नाही. आवश्यक साठे आणि संसाधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून सर्व मंत्रालयांनी योग्य ती तयारी केली आहे. पंतप्रधानांचे आवाहन हे उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आहे. राजन यांनी स्पष्ट केले की, परदेश दौरे, विदेशी पर्यटन, परदेशात होणारे विवाह सोहळे आणि अनावश्यक सोन्याची खरेदी टाळल्यास देशाच्या परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी होईल. नागरिकांनी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी नागरिकांना एका वर्षासाठी अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले असून, त्यामुळे परकीय चलनाचा अपव्यय कमी होण्यास मदत होईल, असे राजन यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी घाबरून जाऊन वस्तूंची साठेबाजी करण्याची गरज नाही. सरकार सर्व परिस्थितींवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.
रविवारी सिकंदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सात महत्त्वपूर्ण आवाहने केली होती. त्यांनी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जबाबदारीने खर्च करण्याचे आवाहन केले. यामध्ये परदेश प्रवास टाळणे, ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार तसेच नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला.


















