पुणे : श्री छत्रपती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शिवाजीराव निंबाळकर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड झाल्याबद्दल सणसर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक प्रमुख उपस्थित होते. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी कारखान्याला ऊस देऊन साथ द्यावी. येत्या पाच-सहा वर्षांत माळेगावच काय, पण सोमेश्वर कारखान्यापेक्षाही चांगला दर देऊ, असा विश्वास जाचक यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्ष जाचक म्हणाले की, काही विजय किंवा निवडी या फक्त निवडणुकीपुरत्या मर्यादित नसतात, तर ते विश्वासाचे, नेतृत्वाचे आणि अनेक वर्षांच्या निस्वार्थ सेवेची पोहोचपावती असते. ‘शिवाजीराव निंबाळकर व मेघराज राजेभोसले यांची निवड सणसर गावाच्या नामवैभवात भर घालणारी ठरली आहे, कार्यक्रमात सणसर ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त करत दोन्ही मान्यवरांचा नागरी सत्कार केला. या वेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर, माजी संचालक विजयसिंह निंबाळकर, शीलादेवी निंबाळकर, संभाजीराव निंबाळकर, सणसरचे सरपंच यशवंत पाटील, विजय पाटील, हेमंतराव निंबाळकर, सणसर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सीमाकाकी निंबाळकर, सरपंच सोनाली निंबाळकर, इंदापूर तालुका अर्बन बँकेचे संचालक तानाजी निंबाळकर, परशुराम रायते, विक्रम निंबाळकर, पोलिस पाटील राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.


















