पुणे : यशवंत कारखान्याच्या थकीत ५८ कोटींच्या देण्यांप्रश्नी न्यायालयात जाण्याचा सभासदांचा निर्णय

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत जमीन विक्रीच्या रकमेतून बँकांची, सभासदांची आणि कामगारांची देणी देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार, पुणे येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी १ सप्टेंबर रोजी कारखान्यास पत्र देऊन सभासदांची देणी स्वतंत्र खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सभासदांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत सभासद राजेंद्र चौधरी, भरत कुंजीर, लोकेश कानकाटे, सागर गोते व उत्तम दळवी यांनी पत्रकार परिषदेत प्रादेशिक सहसंचालकांच्या निर्देशानुसार देण्यांचे नियोजन तातडीने जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन व न्यायालयीन लढ्याचा इशारा दिला.

याबाबत सभासदांनी सांगितले की, २०११ पासून अनेक सभासद दिवंगत झाले असून, त्यांच्या वारसांना थकीत रकमेची माहिती नाही. त्यामुळे ही माहिती कारखान्याच्या आणि प्रत्येक गटातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. ऊस पुरवठा कालावधी, गाळप टन व दराबाबतच्या शंकांचे निरसनही कारखान्याने करावे. ठरल्यानुसार जमीन विक्रीतून मिळालेल्या रकमेतून सभासदांची ५८.६२ कोटींची थकीत देणी प्राधान्याने द्यावीत. दरम्यान, कारखान्याचे संचालक संतोष कांचन म्हणाले, “आम्ही सभासद ऊस बिल देण्याबाबतची यादी प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे, मंजुरी मिळताच त्यानुसार पेमेंट दिले जाईल. हीच मंडळी जमीन विकू नका असे म्हणत होती आणि आज व्याजासह पैसे मागत आहेत. यांना कारखाना चालू व्हावा असे वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here