पुणे : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (पाटस, ता. दौंड) व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकीय कामकाजासाठी सहकारी संस्थांचे (साखर) विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ द्वारकानाथ पवार यांची नियुक्ती केली आहे. पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल हे भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर दि. १० जून रोजी हा आदेश दिलेला आहे. कारखान्याचे भाडेकरू – मेसर्स साईप्रिया शुगर प्रा. लि., (जामखंडी, जिल्हा-बागलकोट, कर्नाटक) यांनी १७ जूनला किंवा त्यापूर्वी निवडणूक निधीसाठी ४० लाख ११ हजार ४७५ रुपयांची रक्कम प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे १९ जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी जमा करावी.
दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंदाजे ६० लाख ११ हजार ४७५ रुपयांपैकी २० लाख जमा केलेले आहेत. आता उर्वरीत रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साखर कारखान्याच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालकांनी १६ जून किंवा त्यापूर्वी अद्ययावत मतदार यादी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात सादर करावी. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे १९ जूनला किंवा त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. भीमा कारखान्याचे प्रशासक द्वारकानाथ पवार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ प्रशासकपदाचा पदभार घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी. प्रभारी कार्यकारी संचालकांनी प्रशासकांना दप्तराचा ताबा देऊन कारखाना निवडणुकीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना साखर सहसंचालक गायकवाड यांनी जारी केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा उल्लेख करून साखर सह संचालकांनी अंशतः बदल आदेश जारी केले आहेत.


















