पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने थेऊर (हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीची विक्री केली आहे. राज्य सरकारच्या परवानगीने ९९.२७ एकर जमिनीपैकी ४९.१८ एकर जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यातून साखर कारखान्यासाठी १४८ कोटी रुपयांचे भागभांडवल उभे राहणार आहे. त्यामुळे गेली पंधरा वर्षे बंद असलेला हा साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या व्यवहाराने बाजार समितीचा जागेचा प्रश्न आणि साखर कारखान्याचा भाग भांडवलाचा प्रश्न सुटणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
पुणे बाजार समितीने राज्य सरकारच्या सर्व परवानगी मिळवून खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. संचालक मंडळातील सभापती प्रकाश जगताप, संचालक नानासाहेब आबवाने व गणेश घुले आणि कारखान्यातर्फे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे व कार्यकारी संचालक कैलास झरे यांनी जमीन खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता यशवंत कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले की, हा कारखाना सुरू करणे हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एक स्वप्न आहे. आर्थिक भागभांडवलाअभावी अडचणी आल्या होत्या. आता सभासदांची मान्यता घेऊन पुढील पावले उचलली जाणार आहेत.


















