पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गट क्रमांक तीनमधील १३ गावांसाठी गेल्या ६३ वर्षांपासून होळ येथे एकमेव कार्यालय होते. मात्र, वाढती सभासदसंख्या आणि ऊसक्षेत्र लक्षात घेता, करंजे परिसरातील शेतकऱ्यांना १०-१४ किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. ऊस नोंदणी, तोडणी आणि बियाणे वाटपासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी सभासदांनी स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली होती. संचालक ऋषिकेश गायकवाड व संग्राम सोरटे यांच्या पाठपुराव्यातून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाने या विभाजनाचा निर्णय घेतला.
या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते झाले. गट ३ अ या होळ कार्यालयात कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रुक, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, होळ, चोपडज या गावांचा समावेश असेल. तर गट ३ ब या नूतन कार्यालय करंजे, करंजेपूल, चौधरवाडी, मगरवाडी, सोरटेवाडी, वाकी, कानाडवाडी या गावांचा समावेश असेल.
राजवर्धन शिंदे यांनी भविष्यात चारचाकी वाहनांसाठी गॅसनिर्मितीचा मानस व्यक्त केला, तर राजेंद्र यादव यांनी सोमेश्वर कारखाना ऊस दरात राज्यात पहिल्या पाचमध्ये राहील, असा विश्वास व्यक्त केला. संचालक संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बापूराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले व ऋषिकेश गायकवाड यांनी आभार मानले. कारखान्याने सभासदांच्या सोयीसाठी गट क्रमांक ३चे दोन भागात विभाजन केले आहे. त्यामुळे करंजे परिसरातील सभासदांना कारखाना कार्यस्थळावर सुविधा मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची पायपीट थांबणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


















