पुणे : सोमेश्वर कारखान्याकडून उच्चांकी दराची परंपरा कायम, ३,९५१ रुपये हप्ता देण्याची घोषणा

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३,९५१ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. इतर कारखान्यांनी आपला दर जाहीर केल्यामुळे सोमेश्वरच्या दराकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले होते. कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे व उपाध्यक्ष संग्राम सोरटे यांनी ही माहिती दिली. यंदाची एफआरपी प्रतिटन ३,४६७ रुपये निश्चित झाली असताना, सभासदांसह गेटकेनधारकांनाही ३,९५१ रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याने यंदाच्या हंगामात गेल्या ३८ दिवसांत तीन लाख ६० हजार टन उसाचे गाळप करून ११.२५ टक्के साखर उतारा मिळविला आहे. आतापर्यंत चार लाखांहून अधिक साखर पोत्यांचे उत्पादन झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कारखान्याच्या नियोजनानुसार, महिन्यानुसार अतिरिक्त अनुदानसुद्धा कायम राहाणार आहे. त्यानुसार, जानेवारीतील उसाला प्रतिटन १०० रुपये, फेब्रुवारीतील उसाला प्रतिटन १५० रुपये आणि मार्चमधील उसाला प्रतिटन २०० रुपये जादा मिळतील. तसेच खोडवा उसाला अतिरिक्त १०० रुपये दिले जाणार आहेत. तर हार्वेस्टर तोडणीस अतिरिक्त ५० रुपये दिले जातील. त्यामुळे मार्चमधील हार्वेस्टर खोडवा उसाला प्रतिटन ४,३०१ रुपयांपर्यंत पहिला हप्ता मिळू शकणार आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी सोमेश्वर कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३,९०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याची मागणी केली होती. मात्र, कारखान्याने संघटनेच्या मागणीपेक्षा ५१ रुपये अधिक दर देत ऊस उत्पादकांना दिलासा दिला. कारखान्याने जाहीर केलेला हा दर पुणे जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांमध्ये सर्वाधिक आहे. कारखान्याच्या इतिहासातीलही ही विक्रमी उचल ठरली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here