नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ५.८८ टक्के होता, जो डिसेंबरमध्ये ५.७२ टक्क्यांवर आला आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताना दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार किरकोळ महागाई डिसेंबरमध्ये ५.७२ टक्क्यांवर आली आहे, जी नोव्हेंबरमध्ये ५.८८ टक्के होती. सर्व जग महागाईचा सामना करत असताना ही बातमी भारतासाठी नक्कीच दिलासादायक आहे.
किरकोळ चलनवाढीचा दर ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) च्या आधारे मोजला जातो. ग्रामीण आणि शहरी भागाच्या आधारे त्याचे मूल्यांकन केले जाते. ग्रामीण भागासाठी ४४८ वस्तू आणि सेवा तर शहरी भागासाठी ४६० वस्तू आणि सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
गुड न्यूज टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, घाऊक बाजारातील वस्तूंच्या सरासरी किमतीतील बदल हे घाऊक किंमत निर्देशांकाच्या अंतर्गत मोजले जातात किंवा ज्याला आपण घाऊक महागाई दर म्हणतो. हा निर्देशांक बाजारातील उत्पादनांची हालचाल तपासण्यासाठी वापरला जातो. भारतात हा निर्देशांक आधार मानून चलनवाढीचा दर काढला जातो. विशेष म्हणजे, दर आठवड्याला घाऊक किंमत निर्देशांकाचे मूल्यांकन केले जाते.