नवी दिल्ली : भारतात एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा धोका वाढला असून, त्याचा परिणाम एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्र आणि ग्रामीण ग्राहकांच्या खरेदीवर होऊ शकतो. फिलिप कॅपिटल (Phillip Capital) च्या अहवालानुसार, मान्सून कमकुवत राहिल्यास कृषी उत्पादन, ग्रामीण उत्पन्न आणि ग्राहकांची खरेदी क्षमता यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा सुमारे 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अहवालात म्हटले आहे की, कमी पावसामुळे कृषी उत्पादन घटू शकते, ग्रामीण भागातील आर्थिक वातावरण कमकुवत होऊ शकते आणि त्याचा परिणाम काही काळानंतर एफएमसीजी उत्पादनांच्या विक्रीवर दिसून येऊ शकतो.
भारताचा नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या कालावधीत सक्रिय असतो आणि देशाच्या वार्षिक पावसापैकी सुमारे 80 टक्के पाऊस याच काळात पडतो. हा कालावधी खरीप पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.तांदूळ, कडधान्ये, तेलबिया, कापूस आणि ऊस यांसारखी प्रमुख पिके मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असल्याने कमी पावसाचा त्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, मान्सून कमकुवत राहिल्यास सुरुवातीला व्यापारी साठा कमी करण्यास सुरुवात करतील, त्यामुळे बाजारातील मागणी कमी होऊ शकते.त्यानंतर एक ते दोन महिन्यांत कृषी उत्पादन घटल्यामुळे अन्नधान्य महागाई वाढू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबे अत्यावश्यक वस्तूंवर अधिक खर्च करतील आणि इतर वस्तूंवरील खर्च कमी करतील, ज्याचा फटका एफएमसीजी क्षेत्राला बसू शकतो.
कमकुवत खरीप हंगामाचा सर्वाधिक परिणाम पावसावर अवलंबून असलेल्या शेती भागांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होईल. त्याचा परिणाम दोन ते तीन महिन्यांनंतर ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत घट होण्याच्या स्वरूपात दिसू शकतो.फिलिप कॅपिटलने इशारा दिला आहे की, एल निनोचा प्रभाव तीव्र राहिला आणि मान्सून कमी पडला, तर त्याचे संपूर्ण परिणाम 2026 च्या अखेरीस अधिक स्पष्टपणे दिसतील.
स्थिती पूर्वीपेक्षा चांगली, तरीही धोका कायम…
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 2015-16 आणि 2023 च्या तुलनेत यंदा एल निनोचा परिणाम काहीसा कमी असू शकतो. यामागे सलग दोन वर्षे चांगला मान्सून, पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) झालेली वाढ आणि सिंचन सुविधांमध्ये झालेली वाढ ही कारणे आहेत. सध्या देशातील सुमारे 60 टक्के शेती क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, तर 2015-16 मध्ये हे प्रमाण 49 टक्के होते. याशिवाय, देशातील धरणांमधील पाणीसाठा दीर्घकालीन सरासरीपेक्षा सुमारे 19 टक्के अधिक असल्याने पावसातील कमतरतेचा काही प्रमाणात परिणाम कमी होऊ शकतो. मात्र, मान्सून खरोखरच कमकुवत राहिल्यास त्याचा पूर्ण परिणाम 2026 च्या अखेरीस स्पष्टपणे दिसून येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


















