पुणे : ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता

पुणे : आधीच एल निनोमुळे गायब झालेला पाऊस, दुष्काळसदृश्य स्थिती असताना ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. माळरानावरील जमिनीतील पिकांकडे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पावसाने दडी मारल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान, त्यामध्येच विजेचा सुरू असलेला लपंडाव यामुळे दौंडच्या पश्चिम पट्टयातील ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. हुमणीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. किड नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या वाढलेल्या किमती, भरमसाठ वाढलेल्या रासायनिक खतांचे दर, मजुरांसाठी वाढलेली रोजंदारी याचा एकत्रित परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.

दरम्यान, कीड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हुमणी नियंत्रणासाठी एकत्रित प्रकाश सापळे, कामगंध सापळे वापरावेत. किडी गोळा करून त्यांचा नायनाट करावा, शेताची दिवसा नांगरणी केल्यामुळे अंडी, अळ्या व कोष, पक्षी खाऊन नष्ट करतात अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत. ऊस पिकावर हुमणीच्या आणि इतर किडींच्या फैलावामुळे शेतकरी त्रस्त आहेत. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी अंकुशराव भरणे यांनी सांगितले की, रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती, तणनाशक, रोग नियंत्रक औषधे, शेतामध्ये मोठ्या प्रमाणात भरमसाट मोलमजुरी वाढली आहे. शेतातील पिकांना निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी कारखान्यांनी उसाला पाच हजार रुपये बाजारभाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोडणी करू देऊ नका असे आवाहन केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here