सातारा : वाढता वाहतूक खर्च, डिझेल आणि पीपी बॅग्जचे वाढलेले दर पाहता साखरेची किमान विक्री किंमत ४५ ते ५० रुपये मिळाल्याशिवाय कारखानदारी टिकणे कठीण झाले आहे, असे मत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष डॉ. भोसले यांनी मांडले. कारखान्याच्या ६७ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा बुधवारी झाला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कराड पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. साखरेचे दर काही दिवस वाढले तरी त्याचा फायदा फार काळ मिळाला नाही. सध्या शेतकरी संघटनांकडून सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत प्रति किलो ५० रुपये करण्याची मागणी केली जात आहे.
अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, यंदा दुष्काळामुळे उसाची वाढ झालेली नाही, तर दुसरीकडे चारा टंचाईमुळे ऊस चाऱ्यासाठी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संकटातून संपूर्ण साखर उद्योगाला सावरण्यासाठी किमान तीन वर्षांचा काळ लागेल. साखर कारखानदारी कठीण टप्प्यातून जात आहे. यंदा दुष्काळाचे सावट आणि उसाच्या टंचाईमुळे राज्यभरातील अनेक कारखाने अवघे ६० ते ९० दिवस चालण्याची शक्यता आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही संपूर्ण ‘कृष्णा’ परिवाराला सोबत घेऊन शिस्त व पारदर्शक कारभाराच्या बळावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना यशाची परंपरा कायम राखेल. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे आदी उपस्थित होते. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांनी मान्यवरांचे सत्कार केले. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.


















