‘शाहू’स सलग दुसऱ्या वर्षी ‘उत्कृष्ट सहवीज प्रकल्प’ पुरस्कार

कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचा देशपातळीवरील ‘उत्कृष्ट सहवीज प्रकल्प’ हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जाहीर झाला आहे. १६ सप्टेंबर रोजी पुणे येथे को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाहू साखर कारखान्यास मिळालेला हा ६८वा पुरस्कार आहे.

‘शाहू साखर’चा २०२२-२३ मध्ये १९८ दिवस सहवीज प्रकल्प कार्यरत होता. ०६ कोटी ९६ लाख ७२ हजार युनिट वीज निर्माण झाली वीज प्रकल्पासाठी ८१ लाख ३० हजार युनिट व साखर कारखान्यासाठी ०२ कोटी ५४ लाख ३८ हजार युनिट वापर होऊन राहिलेली ०३ कोटी ६१ लाख ०४ हजार युनिटची महावितरण कंपनीला विक्री करण्यात आली. महावितरणने प्रतियुनिट रु. ०६.६१ पैसे व रु. ०४.७२ पैसे याप्रमाणे ही वीज खरेदी केल्याने कारखान्यास १९ कोटी १७ लाख ८९ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. हा पुरस्कार म्हणजे ‘शाहू’च्या सभासद, शेतकऱ्यांचा सन्मान आहे. भविष्यातही ‘शाहू साखर’ शेतकरी, सभासदांच्या हितासाठी अखंड कार्यरत राहील, असे भाजपचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले.

शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या कि, सभासद, शेतकरी यांनी विश्वासाने दिलेली साथ आणि व्यवस्थापनाच्या नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह राजे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती वर्षात मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांना अभिवादनच आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले असून हजारो शेतकरी, सभासदांच्या पाठबळावर कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here