सोलापूर : जिल्ह्यात ३२ साखर कारखान्यांकडून २५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप

सोलापूर : राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर जिल्हातील ३५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. त्यापैकी ३२ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यापैकी २१ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडे नोंद आहे. इतर ११ साखर कारखाने सुरू असले तरी त्यांनी गाळपाची माहिती भरलेली नाही. २१ कारखान्यांनी २३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले तर १८ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. इतर कारखान्यांची नोंद नसली तरी वेगाने गाळप सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याचे एकूण ऊस गाळप २५ लाख मेट्रिक टन व त्यापेक्षा अधिक झाले आहे. बीबीदारफळ येथील लोकमंगल अॅग्रोचे ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्याने प्रति टन तीन हजार रुपये याप्रमाणे ऊस बिल जमा केले आहे.

सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मल्टिस्टेट व माढ्याच्या संत कुर्मदास सहकारी या दोन कारखान्यांकडे मागील वर्षाची एफआरपी थकल्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी गाळप परवाने मिळाले नाहीत. जय हिंद शुगर या कारखान्यांचा परवाना साखर आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे. यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने उसाच्या वाढीसाठी हवामान पोषक नाही. याशिवाय उसाला पुरेसे पाणीही नाही. याचा फटका ऊस वाढ व वजनाला बसला आहे. एकरी टनेज मोठ्या प्रमाणावर घटले आहे. उसाची पुरेशी वाढ झाली नसल्याने बरेच साखर कारखाने उशिराने सुरू झाले आहेत. सद्यस्थितीत युटोपियन, सिध्दनाथ, श्री. विठ्ठल पंढरपूर, येडेश्वरी बार्शी, विठ्ठल रिफायनरी पांडे, भैरवनाथ आलेगाव, बबनराव शिंदे तुर्कपिंपरी, जकराया वटवटे, श्री. पांडुरंग श्रीपूर, लोकशक्ती मंद्रूप, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, सिताराम महाराज खड़ीं, आष्टी शुगर मोहोळ, भैरवनाथ विहाळ, शंकर सदाशिवनगर, लोकनेते बाबुराव पाटील अनगर, सासवड माळीनगर, विठ्ठलराव शिंदे करकंब, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, भैरवनाथ लवंगी, इंद्रेश्वर बार्शी यांच्या गाळपाची नोंद आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here