सोलापूर : धोत्री येथील ‘गोकुळ शुगर’कडील थकीत ऊस बिल मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या संघर्षाची तीव्रता वाढली आहे. थकीत बिलप्रश्नी आंदोलन करणाऱ्या गोकुळ थकीत ऊस बील शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती, तुळजापूर व अक्कलकोटच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये विजापूर रोडवरील ऐतिहासिक कंबर तलाव येथे सामूहिक ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या बुधवारी, दि. १० जून रोजी दुपारी बारा वाजता हे आंदोलन होईल. या निवेदनावर अरविंद घोडके, अमोल पाटील, मिलिंद पाटील, खंडू कचरे, नामदेव महाबोटे यांच्यासह अन्य शेतकरी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उद्भवणाऱ्या अनुचित परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,’ असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
सामूहिक जलसमाधी आंदोलनाची सुरुवात पूनम गेट येथून होणार असून रंगभवन, सातरस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय, विजापूर रोड मार्गे मोर्चा कंबर तलावाकडे जाणार आहे. या आंदोलनात तुळजापूर आणि अक्कलकोट परिसरातील सुमारे ५०० शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याने आता प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून पूनम गेट येथे आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.


















