सोलापूर : गेल्या काही हंगामापासून तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना बंद आहे. हे दोन्ही कारखाने सुरु होण्याचे सकारात्मक संकेत मिळालेे आहेत. दोन्ही कारखाने सन २०२३-२०२४ पासून हे कारखाने बंद आहेत. त्यामुळे या कारखान्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, त्यांच्या कुटुंबांचा, कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आला होता. केंद्र सरकारने या दोन्ही कारखान्यांना मदत करून अभय देण्याची भूमिका समोर आल्याने शेतकरी वर्गामधून जोरदार स्वागत केले जात आहे. कारखाने सुरू होणार असल्याने आदिनाथ कारखान्याचे तब्बल ३३ हजार शेतकरी सभासद व मकाई कारखान्याचे १६ हजार सभासद, दोन्ही कारखान्याचे हजारो कामगार यामुळे आनंदित झाले आहेत.
याबाबत मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी सांगितले की, सरकारने श्री मकाई सहकारी साखर कारखान्याला उभारी देण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय जाहीर केल्याने संपूर्ण १६ हजार सभासद शेतकऱ्यांसह संचालक मंडळ, नेत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भाजपच्या नेत्या रश्मी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सक्षमपणे चालवू. तर आदिनाथ कारखान्याचे चेअरमन तथा आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्यातील बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे मी स्वागत करतो. कारखाना हा लिलावाच्या अंतिम टप्प्यात असताना केंद्र सरकारने मोडकळीस अथवा बंद कारखान्यांना ताकद देऊन सुरू करण्याचा घेतलेला हा निर्णय खूप महत्त्वाचा व कर्जाच्या खाईतून बाहेर पडण्यासाठी आशेचा किरण आहे.
दरम्यान, राज्यातील बंद १९ सहकारी साखर कारखाने पुन्हा चालू करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये बार्शी तालुक्यातील श्री संतनाथ कारखान्याचा समावेश आहे. केंद्र सरकारने या कारखान्याची माहिती मागवल्याने वैरागकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा कारखाना गेली वीस वर्षे बंद आहे. माजी खासदार तुळशीदास जाधव यांनी १९८०-८१ च्या सुमारास याची स्थापना केली होती. आर्थिक अडचणी व इतर कारणांमुळे हा कारखाना मागील दोन दशकांपासून बंद आहे. राज्य सहकारी बँकेने लिलावासाठी काढला होता. श्री स्वामी समर्थ कारखाना पुन्हा सुरू व्हावा ही शेतकऱ्यांची मागणीही पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. तत्कालीन चेअरमन सिद्धारामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांना सोबत घेऊन प्रयत्न करण्यात आले. सध्या कारखान्याचा ताबा एमएससी बँक मुंबई व जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूरकडे असल्याचे संचालक अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.


















