सोलापूर : साखर आयुक्तांनी दरवर्षी साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी परवाना देताना त्यांच्या थकीत देयकांचा आढावा घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची जुनी देणी न भागवता पुन्हा गाळप परवाना मिळत असेल, तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांनाच बसतो, अशी भूमिका शेतकरी संघर्ष हक्क समितीने घेतली आहे. संबंधित कारखान्यांकडून थकीत ऊसबिले, एफआरपी, तोडणी व वाहतूक बिलांचा अद्ययावत अहवाल तातडीने मागवावा, अशी सूचनाही निवेदनातून केली आहे. याप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी व अन्य पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील साखर आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात दिले. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
याबाबत शेतकरी संघर्ष हक्क समितीने म्हटले आहे की, सोलापूर विभागातील अनेक साखर कारखान्यांकडून सन २०२४-२५ व २०२५-२६च्या गाळप हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची ऊस बिले तसेच तोडणी व वाहतूक कामगारांची बिले अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आरआरसी कारवाई झालेल्या अथवा आरआरसीसाठी शिफारस झालेल्या कारखान्यांना २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी परवाना देऊ नये. याशिवाय, थकीत ऊस बिलांसह तोडणी व वाहतूक बिले तातडीने अदा करण्याचे निर्देश संबंधित कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी समितीने केली. बिले अदा न केल्यास आगामी २०२६-२७ हंगामाच्या गाळप परवान्यासाठी कारखान्याने प्रस्ताव सादर केल्यास गाळप परवाना रोखण्याबाबतचा अहवाल प्रादेशिक कार्यालयाने साखर आयुक्तांकडे पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.


















