उर्वरीत एफआरपीऐवजी साखर योजना अपयशी

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा

कोल्हापूर : चीनी मंडी

साखर कारखान्यांनी एफआरपीची फोड करून पहिला हप्ता २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. पण, एक रकमी एफआरपीवर ठाम राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उर्वरीत एफआरपीऐवजी साखरेची मागणी केली. त्याला साखर कारखान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पण, शेतकऱ्यांपुढे मिळालेली साखर विकायची कोठे असा प्रश्न असल्याने त्यांनी या योजनेविषयी फारशी उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे ही योजना अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच उसाच्या एफआरपीचा प्रश्न गाजला. देशांतर्गत बाजारातील साखरेची कमी मागणी आणि मंदावलेली निर्यात यांमुळे साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये साखर पडून आहे. साखरेला उठावच नसल्यामुळे कारखाने अडचणीत आले आणि एफआरपीचा बोजा वाढत गेला. एक रकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे सांगून, कारखान्यांनी २३०० रुपये एफआरपी जमा करण्यास सुरुवात केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ जानेवारीला पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढल्यानंतर आयुक्तांनी कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे संघटनेच्या एक रकमी एफआरपीच्या मागणीमुळे एफआरपीच थकवलेल्या कारखान्यांनीही २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र कारखानदारांसमोर ऊस उत्पादकाला उर्वरित एफआरपीचे पैसे द्या, नाही तर साखर द्या, असा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला साखर कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन सात दिवसांच्या आत मागणी नोंदवावी, असे आवाहनही केले होते; पण त्याला आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

शेतकरी व्यापारी त्यातच देशात साखरेला फारशी मागणी नाही. त्यामुळे कारखान्याची साखर विकायची कोठे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे योजनेचा गाजावाजा झाला तरी, शेतकऱ्यांच्या पातळीवर त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. शेतकरी संघटनेने कारखान्यांची साखर दिल्ली, मुंबईतील व्यापाऱ्यांना विकण्यासाठी यंत्रणा उभारण्याची व्यवस्था असल्याचे सांगितले. त्यासाठी कारखान्यांची गोदामे देण्याची मागणी संघटनेने केली आहे. हे सगळे झाले तरी, साखरेच्या जीएसटीचे गणितही या योजनेसाठी अडथळा ठरले आहे. त्यामुळे एफआरपी ऐवजी साखर ही योजना अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता उर्वरीत एफआरपीची चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here