निर्यातबंदीच्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर साखर उद्योगाची पत खालावण्याची कारखानदारांना भीती

मुंबई : यंदाच्या हंगामात देशात ३२९ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात साखर उत्पादन २७९ लाख टनांपर्यंत झाले. उत्पादन जास्त होईल या शक्यतेने केंद्र सरकारने यावर्षी आधी १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. नंतर साखर निर्यातीचा कोटा फेब्रुवारी महिन्यात आणखी वाढविला होता, त्यामुळे देशातून एकूण १५.९० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. पण साखर उत्पादक राज्यात अपेक्षित साखर उत्पादन झाले नाही. त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने सरकारने तातडीने निर्यातबंदी केली आहे. मात्र या निर्णयावर साकर उद्योगाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अशा धरसोड वृत्तीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत कमी होईल, अशी भीती आहे. हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, साखर उद्योगाबाबत केंद्र सरकारचे धोरण नेहमीच धरसोड वृत्तीचे राहिले आहे. इथेनॉलचे धोरण ठरवले. अनेकांनी या व्यवसायात गुंतवणूक केली, मात्र ते सारे अडचणीत आले आहेत. आता साखरेतून काही नफा मिळेल, असे वाटत असताना अचानक घातलेल्या निर्यातबंदीमुळे उद्योग अडचणीत येईल. तर वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, साखरेचे दर स्थिर राहावेत म्हणून एकूण २० लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर पाहता या हंगामात आतापर्यंत आठ लाख टन साखरच निर्यात झाली आहे. तरीही अचानक बंदी घालण्यात आली. यामुळे साखर व्यावसायाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पत खालावू शकते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here