सोलापुरात उसाची पळवापळवी, दरासाठी कारखानदारांत चढाओढ

सोलापूर : जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून जादा ऊसदर देण्यात चढाओढ सुरू झाली आहे. ऊस पळवापळवी सुरू आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला जास्त दर देण्याचे जाहीर केले. आता इतर कारखाने त्याचे अनुकरण करीत आहेत. शेजारच्या कर्नाटकात उसाला मिळणाऱ्या वाढीव दराची किनारही याला आहे.

‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात यंदा ४१ पैकी ३८ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीची नोंद असली तरी पाण्याअभावी सुमारे ३० हजार हेक्टर ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. साखर उताराही घटण्याची चिन्हे आहेत. गेल्यावर्षी ३३ साखर कारखान्यांनी १२० दिवस गळीत हंगाम चालवला. २,२९,५३,०९४ मे. टन ऊस गाळप केला. त्यातून २,१६,१७,०९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.

यंदा मात्र आणखी पाच म्हणजे ३८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. सुरूवातील कारखान्यांनी उसाला प्रती टन २३०० ते २५०० रुपयांचा हप्ता जाहीर केला. मात्र, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यानेअडचणीत असूनही २४०० रुपये पहिला हप्ता आणि २९०० रुपये अंतिम दर जाहीर केला. त्यामुळे इतर कारखान्यांना पहिला हप्ता २,७०० रुपयांपर्यंत वाढवावा लागला आहे. आता पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल शुगर, भीमा, जकराया, पंढरपूरचा विठ्ठल, जयहिंद, लोकमंगल, सिध्दनाथ व इतर कारखान्यांनी वाढीव हप्ता देण्याची तयारी दाखवली आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यानेही २,७०० रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. टाकळी सिकंदरच्या भीमा साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा १२५ रुपये जादा दर देण्याचे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here