‘स्वाभिमानी’चे आंदोलन केवळ पाच साखर कारखान्यांभोवतीच : आमदार प्रकाश आवाडे

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन हे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील केवळ पाच साखर कारखान्यांपुरतेच आहे. यातून शेट्टी यांचे केवळ स्वार्थाचे राजकारण सुरू असून, लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्याकडून आटापिटा केला जात आहे, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे. महाराष्ट्रात अधिक दर मिळत असतानाही कमी दर देणाऱ्या कर्नाटकात ऊस पाठवा म्हणून सांगत शेट्टी यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये आणि यंदाचा ३५०० चा पहिला हप्ता जाहीर करावा यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याबाबत आमदार आवाडे म्हणाले की, कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपेक्षा २०० ते ३०० रुपये कमी दर देत आहेत. तरीही तिकडे ऊस पाठवा असे सांगणारे नेते शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. महाराष्ट्रात एकरकमी एफआरपी दिली जाते, तर कर्नाटकात ती तीन टप्प्यात मिळते, असा आरोप त्यांनी केला.

आमदार आवाडे म्हणाले की, केवळ दत्त, गुरुदत्त, शरद, जवाहर आणि पंचगंगा या कारखान्यांना वेठीस धरून आंदोलन केले जात आहे. राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण झाल्यास अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी पुढील वर्षी ऊस क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस कसा वेळेत साखर कारखान्यांना जाईल, याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here