पुणे : साखर कारखानदारीमुळे महाराष्ट्राची जगात वेगळी ओळख निर्माण झाली. सध्या साखर उद्योग आर्थिक अडचणीतून जात आहे. राज्यातील काही कारखान्यांनी गरज नसताना गाळप क्षमता विस्तार केल्याने अडचणीत भर पडल्याचे मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने आयोजित साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले कि, आता यातून मार्ग काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. पाण्याचे योग नियोजन करावे लागेल. ‘एआय’चा वापर करून ऊस उत्पादन वाढवावे लागेल. राज्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था साखर उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे साखर उद्योगाने विचार करून पाऊल टाकणे गरजेचे असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. जिथे गरज आहे तिथे सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, खासदार बजरंग सोनवणे, महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख, संचालक रोहित नारा आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले आदीसह साखर कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















