उत्तर प्रदेश: साखर उतारा घटल्याने कारखान्यांच्या अडचणीत वाढ, ऊस दरावरही परिणाम शक्य

महराजगंज : साखरेचा सरासरी उतारा घटल्याने राज्यातील साखर कारखानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत उतारा घटल्याने जिल्ह्यातील सिसवा साखर कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत कारखान्यांना द्याव्या लागणाऱ्या ऊस दराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावर्षी, २०२१-२२ या गळीत हंगामात सिसवा कारखान्याने शेतकऱ्यांकडून २३.३० लाख क्विंटल उसाची खरेदी केली होती. कारखान्याचा हंगाम संपला तेव्हा सरासरी प्रती क्विंटल ११.१७ किलो साखर उतारा मिळाला होता. तर यंदा,२०२२-२३ या गळीत हंगामात शेतकऱ्यांकडून २९ लाख १८ हजार क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला. साखर उतारा १०.८५ किलो प्रती क्विंटल आहे. उतारा घटल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे. सिसवा कारखान्याचे व्यवस्थापक कर्मवीर सिंह यांनी सांगितले की, उतारा घटल्याने कारखान्याचे जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, याची झळ शेतकऱ्यांना पोहोचू दिली जाणार नाही. त्यांना सर्व पैसे दिले जातील.

जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यादव यांच्या म्हणण्यानुसार, सिसवा कारखान्याच्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी चांगली ऊस शेती केली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी को-०२३८, को ०११८, कोएल ९४१८४, को ९८०१४, को ८२७२ आदी चांगल्या वाणांची लागवड केली होती. तरीही उतारा समाधानकारक नाही. दरम्यान, इतर जिल्ह्यांतही अशीच स्थिती आहे. कप्तानगंज, पिपराईच आदी साखर कारखान्यांना ऊस बिले अदा करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here