कोल्हापूर, सांगलीच्या तुलनेत ऊस दरात प्रतिटन ७००-८०० रुपयांचा फरक का ? – धाराशिवच्या शेतकऱ्यांचा सवाल

धाराशिव : दरवर्षी कोल्हापूर-सांगली या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यात ऊस दरात प्रतिटन तब्बल ७०० ते ८०० रुपयांची तफावत असते. हे एकाप्रकारे साखर कारखानदारांकडून होणारे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण आहे. अशा वर्षानुवर्षे सुरू असलेल्या शोषणामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करतात असा आरोप जिल्ह्यातील तेरणा परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शपुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील खासदार आणि चार आमदारांकडे केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. याशिवाय या मागणीचा फलक ढोकी येथील बसस्थानक चौकात उभारण्यात आला आहे. ढोकी चौकातला हा बोर्ड येण्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून, तेरणा परिसरात सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. कारखान्यांकडून कमी दर देऊन होणाऱ्या शोषणाविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून आपली मतदारांप्रती असलेली बांधिलकी दाखवून द्यावी, असे स्मरण पत्रातून करून देण्यात आले आहे. मंगळवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार तानाजी सावंत यांच्या अधिकृत मेलवर हे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनावर सुधाकर पाटील, दत्ता कोकाटे, दत्तात्रय देशमुख, गोरोबा डांगे, सुरेश समुद्रे, उत्तम वाकुरे आणि श्यामराव देशमुख यांच्यासह २३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here